Ad will apear here
Next
अनुपम खेर, साधना सरगम, व्हिव्हियन रिचर्डस्, नरी काँट्रॅक्टर, आत्माराम सावंत, रवींद्र केळेकर, आदर्श शिंदे


ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, नामवंत गायिका साधना सरगम, ज्येष्ठ क्रिकेटपटू सर व्हिव्हियन रिचर्डस् आणि नरी काँट्रॅक्टर, पत्रकार, नाटककार, लेखक, कवी आत्माराम सावंत, नामवंत गोमंतकीय साहित्यिक व गांधीवादी विचारवंत रवींद्र केळेकर, तसेच पार्श्वगायक आदर्श शिंदे यांचा सात मार्च हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
..........
अनुपम खेर
सात मार्च १९५५ रोजी अनुपम खेर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सरकारी क्लार्क होते. खेर यांचे प्राथमिक शिक्षण सिमला येथील ‘डीएव्ही’ प्रशालेत झाले. महाविद्यालयीन शिक्षण दिल्ली विद्यापीठातून झाले. ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी विद्यार्थी आहेत. अभिनयात करिअर करण्याच्या हेतूने ते मुंबईला आले. हॉलिवूड, बॉलिवूड दोन्ही आघाड्यांवर कार्यरत राहून निर्माता, दिग्दर्शक, शिक्षक आणि अगदी लेखकाच्या भूमिकेतूनही वावरणाऱ्या अनुपम खेर यांच्या कारकिर्दीची सुरवात १९८२ साली ‘आगमन’ या चित्रपटाने झाली; पण १९८४ सालच्या महेश भट्ट दिग्दर्शित ‘सारांश’ या चित्रपटाने अनुपम खेर यांचे नाव झाले. 

‘सारांश’मध्ये बी. व्ही. प्रधान या शाळेच्या निवृत्त झालेल्या मुख्याध्यापकांची भूमिका करायची होती. या भूमिकेसाठी निर्मात्यांना कोणी तरी प्रसिद्ध आणि अनुभवी कलाकार हवा होता. त्या वेळी या भूमिकेच्या मानाने तरुण असलेल्या अनुपम खेर यांनी ही भूमिका आपण उत्तम वठवू शकू, असा विश्वास दिला होता. अनेक घडामोडींनंतर अखेर ही भूमिका त्यांच्या पदरी पडली आणि त्यांची कारकीर्द सुरू झाली. बॉलीवूडमध्ये ‘हम आपके है कौन’, ‘डॅडी’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’सारख्या व्यावसायिक चित्रपटांपासून ते ‘वेनस्डे’, ‘स्पेशल २६’, ‘खोसला का घोसला’, ‘मैंने गांधी को नहीं मारा’सारख्या वेगळ्या वाटेवरच्या चित्रपटांमधूनही त्यांनी भूमिका केल्या आहेत. 

बॉलीवूडप्रमाणेच हॉलीवूडमधलीही त्यांची वाट जुनीच आहे. ज्या वेळी ओम पुरी, नसीरुद्दीन शहा यांच्यासारखे मोजकेच कलाकार हॉलीवूडमध्ये काम करत होते त्याच वेळी अनुपम खेर यांनी तिथली वाट धरत ‘बेंड इट लाइक बेकहॅम’, अँग लीचा ‘लस्ट, कॉशन’ आणि वूडी अॅडलनचा ‘यू विल मीट अ टॉल डार्क स्ट्रेंजर’ अशा हॉलीवूडपटांमधून काम केलं होतं. अॅकॅडमी अॅवॉर्ड विजेता ठरलेला रॉबर्ट डी निरो यांचा ‘सिल्वर लाइनिंग्ज प्लेबुक’ हा त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरलेला हॉलीवूडपट आहे. त्याशिवाय, हॉलीवूड अभिनेता गेरार्ड बटलरबरोबर ‘द हेडहंटर कॉलिंग’ या मार्क विल्यम दिग्दर्शित हॉलीवूडपटातही त्यांनी काम केलं आहे. 

अनुपम खेर यांनी ५००हून अधिक चित्रपटांत व १००हून अधिक नाटकांत काम केलं आहे. पाचशेव्या चित्रपटाचं नाव ‘द बिग सिक’ असं असून, मायकेल शोवॉल्टर दिग्दर्शित या चित्रपटात ऑस्कर विजेता अभिनेता हॉली हंटर, झो काझन आणि रे रोमानो या हॉलीवूड कलाकारांनी काम केले आहे. 

अनुपम खेर यांना पाच वेळा बेस्ट कॉमिक रोल साठी फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला आहे. ‘विजय’साठी त्यांना सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर मिळाला आहे. ते सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा इंडिया, एफटीआयआयचे अध्यक्षही होते. हिंदी सिनेमा आणि कला क्षेत्रात अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण देऊन सन्मानित केले आहे. त्यांची पत्नी किरण खेरदेखील अभिनेत्री आहेत.
.......... 
साधना सरगम
सात मार्च १९७४ रोजी दाभोळ येथे साधना सरगम यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव साधना घाणेकर. बालपणापासून संगीताची आवड असलेल्या साधना यांच्या मातोश्री नीला घाणेकर या शास्त्रीय गायिका होत्या. नीला घाणेकर यांची संगीतकार अनिल मोहिलेंसोबत ओळख होती. ते कल्याणजी-आनंदजी यांच्यासाठी म्युझिक अरेंजिंगचे काम बघायचे. त्यांनीच साधना यांची कल्याणजी-आनंदजींसोबत भेट घालून दिली होती. त्यानंतर साधना यांनी १९७८मध्ये आलेल्या फिल्म ‘तृष्णा’साठी कोरस गायले होते. त्या गाण्याचे बोल होते ‘पम परम पम बोले जीवन की सरगम’. या गाण्याला किशोर कुमार यांनी स्वरसाज चढवला होता. त्यानंतर साधना यांनी वयाच्या सातव्या वर्षीपासून पंडित जसराज यांच्याकडे संगीताचे धडे गिरवले. १९८२मध्ये आलेल्या ‘विधाता’ या चित्रपटातील ‘सात सहेलियां खडी खडी’ हे गाणे गाऊन साधना यांनी बॉलिवूडमध्ये धमाल केली होती. साधना सहा वर्षांच्या असताना त्यांनी दूरदर्शनसाठी ‘सूरज एक चंदा एक तारे अनेक’ हे बोल असलेले गीत गायले होते. हे गाणे त्या वेळी खूप गाजले होते. साउथ इंडियन गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या साधना या पहिल्या नॉन साउथ इंडियन सिंगर आहेत. 

कल्याणजी-आनंदजी जोडीपासून ए. आर. रहमानपर्यंत प्रत्येकाने त्यांचे कौतुक केले आहे. उदित नारायण यांच्यासोबत ‘जो जीता वही सिकंदर’ या सिनेमातील ‘पहला नशा पहला खुमार’ हे गाजलेले गाणे गाऊन प्रसिद्धीझोतात आलेल्या साधना सरगम यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून गायन सुरू केले होते. वयाच्या चौथ्या वर्षी साधना यांनी सवाई गंधर्व महोत्सवामध्ये गाणे सादर केले होते. 

साधना घाणेकरच्या साधना सरगम कशा झाल्या, याविषयी त्या एका मुलाखतीत म्हणतात, ‘सरगम हेच माझे जीवन आहे. माझ्या पहिल्याच गाण्यावेळी मी सरगम गायले. ते सर्वांना आवडले अन् माझे नाव साधना सरगम असे उच्चारले जाऊ लागले. माझ्या कामाची ही पावती होती. मी आजवर ३४ विविध भाषांत गायले आहे; पण मराठीत संस्मरणीय गाणी गाण्याची संधी माझ्या वाट्याला आलीच नाही. मी मराठी मुलगी असूनही मराठीतील गाणे गायले नाही, हे दु:ख मनात आहेच.’ 

सात समंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गई, हर किसी को नहीं मिलता, मैं तेरी मोहब्बत में, तेरी उम्मीद तेरा इंतजार आणि नीले नीले अंबर पर अशी त्यांची अनेक गाणी प्रसिद्ध आहेत. साधना सरगम यांनी अंदाजे १५०० हिंदी चित्रपटांत २०००हून अधिक गाणी गायली आहेत. ५००हून अधिक तमिळ चित्रपटत १०००हून अधिक तमिळ गाण्यांना त्यांनी आवाज दिला आहे. १९९४ ते २०१५ या काळात साधना सरगम यांनी २५००हून अधिक बंगाली गीते गायली आहेत. त्याशिवाय त्यांनी तेलुगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, नेपाळी अशा एकूण ३४ भाषांत गाणी गायली आहेत. 

साधना सरगम यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मध्य प्रदेश सरकारने त्यांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना १९८८ आणि २००४ मध्ये फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. साधना यांना पाच वेळा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. शिवाय त्यांना ओडिशा राज्याचा चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. आपल्या चार दशकांच्या करिअरमध्ये साधना सरगम यांनी आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 
......
सर व्हिव्हियन रिचर्डस्
सात मार्च १९५२ रोजी सर व्हिव्हियन रिचर्डस् यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव आयझॅक व्हिव्हियन अलेक्झांडर रिचर्डस्. सर व्हिव्हियन रिचर्डस् यांनी आपल्या टेस्ट करिअरची सुरुवात भारताविरोधात केली होती. २२ नोव्हेंबर १९७४ रोजी बेंगळुरूमध्ये झालेल्या कसोटीत त्यांनी पदार्पण केले होते. रिचर्डस् जेव्हा मैदानात फलंदाजी करण्यास जात असत, तेव्हा खेळ बघणारांचा श्वास थांबत असे. जबरदस्त चौकार आणि उंच षटकार मारणारे रिचर्डस् त्या काळी क्रिकेटशौकिनांत लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होते. त्यांची क्रेझ आजही क्रिकेट जगतामध्ये कायम आहे. 

१८७ एकदिवसीय सामन्यांतून ४७च्या सरासरीने सर व्हिव्हियन रिचर्डस् यांनी ६५००पेक्षा अधिक धावा काढल्या आहेत. चार विश्वचषक स्पर्धांच्या २३ सामन्यांत ६३पेक्षा सरासरीने १०००पेक्षा अधिक धावा त्यांनी काढल्या आहेत. 
.........
नरी काँट्रॅक्टर
सात मार्च १९३४ रोजी नरीमन जमशेदजी तथा नरी काँट्रॅक्टर यांचा जन्म झाला. १९६०-६१ साली कॉन्ट्रॅक्टर हे भारताचे कर्णधार झाले होते. त्या वेळी त्यांचे वय होते २६ वर्षे. कॉन्ट्रॅक्टर यांनी ३१ कसोटी सामन्यांमध्ये ३१च्या सरासरीने १६११ धावा केल्या आहेत. 
......
आत्माराम सावंत
सात मार्च १९३३ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हुमरस येथे आत्माराम सावंत यांचा जन्म झाला. आत्माराम सावंत यांचे बालपण कोकणात गेल्यामुळे लहानपणापासून कीर्तनाची व गणपतीत होणाऱ्या मेळ्यांची आवड होती. त्यांचे वडील शेतकरी होते. त्यांनी आत्माराम यांना मॅट्रिकपर्यंत शिक्षण देऊन नोकरीसाठी मुंबईला धाडले. मुंबईत आल्यावर आत्माराम सावंत नव्यानेच सुरू झालेल्या कामगार नाट्यस्पर्धेत सहभागी होऊ लागले. १९५३ ते १९६० या काळात त्यांनी कामगार नाट्यस्पर्धांसाठी अनेक कौटुंबिक नाटकांचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली आणि काही पारितोषिकेही मिळवली. १९६० ते १९७० या काळात सावंत दैनिक नवा काळ आणि दैनिक मराठामध्ये पत्रकारिता करत होते. 

पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी आपल्या अनुभवांवर बेतून शब्दबद्ध केलेली ‘चौथा अंक’ आणि खुर्चीचा खेळ’ ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत. नवशक्ती, नवा काळ, मराठा आणि मुंबई सकाळ या विविध वृत्तपत्रांत आत्माराम सावंत यांनी उपसंपादक, सहसंपादक, मुख्य संपादक आदी विविध पदांवर काम केले आहे आणि ते करताना बरेच स्फुट लेखन केले. १९७०मध्ये आत्माराम सावंत परत रंगभूमीकडे वळले. याच काळात त्यांना नाटककार म्हणून अपार लोकप्रियता मिळाली. राजकारण गेलं चुलीत, वरचा मजला रिकामा ही त्यांची नाटके खूप गाजली. 

१९९४ साली मालवण येथे भरलेल्या ७४व्या मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. आत्माराम सावंत यांचे चार मार्च १९९६ रोजी निधन झाले
..........
रवींद्र केळेकर
सात मार्च १९२५ रोजी कंकोलिम (गोवा) येथे रवींद्र केळेकर यांचा जन्म झाला. त्यांना रवींद्रबाबा म्हणत असत. त्यांचे वडील डॉ. राजाराम बाबा केळेकर हे डॉक्टर होते. गुजरातेतील ‘दीव’ येथे ते प्रॅक्टिस करत असल्याने, तेथे वास्तव्य असल्याने रवींद्रबाबांचे बालपण, प्राथमिक शिक्षण गुजराती भागात गेले. पण महाविद्यालयीन शिक्षण गोव्याच्या अल्मेडा कॉलेजात झाले. रवींद्र केळेकर गांधी विचारांनी प्रभावित झाले व त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. गोवा स्वातंत्र्यसंग्रामातही त्यांचा मोठा सहभाग होता. कोकणीबरोबरच मराठी व हिंदी भाषेतूनही त्यांनी विपुल लेखन केले आहे. 

कोकणीला राज्यभाषा करण्यासाठी गोव्यात उभारलेल्या लढ्यात ते अग्रेसर होते. महाभारताचा त्यांनी कोकणीतून अनुवाद केला असून, त्यांच्या नावावर सुमारे ३२ पुस्तके आहेत. साठ वर्षे सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात कार्य केलेले गोमंतकीयांचे रवींद्रबाबा हे आधुनिक कोकणीचे जनक होते. गोव्याची ओळख, कोकणी भाषा व रवींद्रबाबा हे एक समीकरण झाले होते. गोव्याच्या तरुण पिढीवर ज्यांचा प्रभाव होता, असे रवींद्रबाबा हे स्वातंत्र्यपूर्व काळातील एकमेव प्रभावी साहित्यिक होते. 
कोकणीतील तीन पिढ्यांना ज्यांचे मार्गदर्शन लाभले असे ते एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. गोवा महाराष्ट्र विलीनीकरणाला त्यांनी विरोध केला होता व त्या लढ्याचे नेतृत्वही त्यांनी केले होते. ‘जाग’ या कोकणी मासिकातून त्यांनी गोमंतकीयांना जागविण्याचे व विचार करायला लावणारे लेखन केले होते. त्यांनी सुरू केलेले ‘जाग’ हे मासिक आज कोकणीतील सर्वांत जुने व पूर्णपणे साहित्याला वाहिलेले मासिक आहे. 

१९८४ ते १९९२ या कालखंडात गोवा विलीनीकरण, गोव्याला राज्याचा दर्जा, कोकणीचा आठव्या परिशिष्टामध्ये समावेश व कोकणी गोव्याची राज्यभाषा करण्यासाठी रवींद्रबाबा यांनी केलेल्या कार्यामुळे ते गोमंतकीयांचे खऱ्या अर्थाने ‘हीरो’ ठरले होते. भारतीय साहित्यातील उत्कृष्ट योगदानाबद्दल २००६चा ज्ञानपीठ पुरस्कार कोकणी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र केळेकर यांना प्रदान करण्यात आला. कोकणी भाषेला त्यांच्यामुळे प्रथमच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता. 

रवींद्रबाबा केळेकर यांचे पोर्तुगीज, गुजराती, हिन्दी, मराठी, कोकणी भाषांवर प्रभुत्व होते. पण लिहायचं ते फक्त कोकणीतच व कोकणीकरिताच, अशी भूमिका असलेल्या या झुंजार लेखकाला ‘लेखक’ म्हटलेले आवडत नाही. मग ते म्हणायचे, ‘मी रायटर नाही. फायटर आहे.’ रवींद्र केळेकर यांचे निधन २७ ऑगस्ट २०१० रोजी झाले.
..........


आदर्श शिंदे
सात मार्च १९८८ रोजी आदर्श शिंदे या आज प्रसिद्ध असलेल्या तरुण गायकाचा जन्म झाला. तो भीमगीतांसाठी प्रसिद्ध असून, त्याने अनेक लोकगीते व चित्रपट गीतेही गायली आहेत. आदर्श शिंदे एका समृद्ध गायनपरंपरा असलेल्या कुटुंबातील आहेत. आनंद शिंदे हे त्यांचे वडील, मिलिंद शिंदे हे काका आणि गायक प्रल्हाद शिंदे हे त्यांचे आजोबा होत. 

आदर्शने वयाच्या दहाव्या वर्षापासून गाणे शिकायला सुरुवात केली. त्याने सुरेश वाडकर यांच्याकडून शास्त्रीय संगीतातील धडे घेतले आहे. वडील आनंद आणि काका मिलिंद शिंदे यांच्यासोबत अल्बममध्ये गायन करून त्याने करिअरची सुरुवात केली. ‘स्टार प्रवाह’ या दूरचित्रवाणीवरील ‘आता होऊन जाऊ द्या’ या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतल्याने लोक त्याला ओळखू लागले. २०१४मध्ये ‘शिंदे’ कुटुंबाने प्रियतमा या चित्रपटासाठी एकत्र गायन केले. तीन पिढ्यांचे एकत्र पार्श्वगायन ही मराठी चित्रपट उद्योगात घडलेली पहिलीच घटना होती. 

आदर्शने मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये १५००हून अधिक गाणी गायली आहेत. ‘दुनियादारी’ चित्रपटामधील ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’ आणि ‘ख्वाडा’ चित्रपटातील ‘गाणं वाजू दे’ या गीताने आदर्शला मोठी लोकप्रियता मिळाली. ‘प्रियतमा’, ‘पोस्टर गर्ल’, ‘बाजी’, ‘दगडी चाळ’, ‘वायझेड’, ‘हलाल’, ‘रिंगण’ आदी चित्रपटांसाठीही त्याने पार्श्वगायन केले आहे. विविध रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक, तसेच सूत्रसंचालक म्हणूनही त्याने काम पाहिले आहे. आदर्श शिंदेने त्याची गर्लफ्रेंड नेहा लेलेसोबत लग्न केले आहे. नेहासुद्धा गायिका आहे. 

आदर्श आणि त्याचा भाऊ उत्कर्ष यांनी ‘शिंदेशाही’ नावाने स्वतःचा ऑर्केस्ट्रा सुरू केला आहे. यातून ते प्रेक्षकांसाठी अनेक सुरेख मैफिली सजवत असतात. 

माहिती संकलन : संजीव वेलणकर



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZWKCK
Similar Posts
सत्यजित रे, भालजी पेंढारकर, लिओनार्दो दा व्हिन्सी, स्वाती चिटणीस आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांची जन्मशताब्दी आजपासून (२ मे २०२०) सुरू होत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक भालजी पेंढारकर आणि अभिनेत्री स्वाती चिटणीस यांचा दोन मे हा जन्मदिन. तसेच, जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो दा व्हिन्सी यांचा दोन मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय
राम गणेश गडकरी, डी. एस. खटावकर, पं. दिनकर कैकिणी नामवंत लेखक, कवी, नाटककार राम गणेश गडकरी, ख्यातनाम शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार दत्तात्रेय श्रीधर खटावकर आणि आग्रा घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी यांचा २३ जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
अशोक समेळ, मिलिंद इंगळे, स्मिता सरवदे-देशपांडे, शेख मुख्तार ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ, प्रसिद्ध संगीतकार व गीतकार मिलिंद इंगळे, प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता सरवदे-देशपांडे यांचा १२ मे हा जन्मदिन. तसेच, बॉलीवूडचे पहिले ‘माचो मॅन’ अभिनेते शेख मुख्तार यांचा १२ मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
नंदू भेंडे, जेम्स पार्किन्सन, शुभांगी अत्रे-पुरी मराठीतील पहिले रॉकस्टार नंदू भेंडे यांचा ११ एप्रिल हा स्मृतिदिन. तसेच, पार्किन्सन्स डिसीजचा शोध लावणारे ब्रिटिश डॉक्टर जेम्स पार्किन्सन आणि अभिनेत्री शुभांगी अत्रे-पुरी यांचा ११ एप्रिल हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language